मल्टी टास्कींग की मल्टी रिस्कींग

 आजच्या या वेगवान जगात 'मल्टी-टास्किंग' हा शब्द एखाद्या देवमाणसासारखा पुजला जातो. जो एकाच वेळी पाच-सहा कामं करतो, तो जणू या युगाचा सुपरमॅन! पण खरं सांगायचं तर, हा सुपरमॅन अनेकदा स्वतःच्याच चड्डीत पाय अडकून तोंडावर पडताना दिसतो. माणसाला निसर्गाने एकच डोकं दिलंय, हे आपण सोयीस्करपणे विसरलो आहोत. आपल्याला वाटतं की आपण एकाच वेळी भाजी चिरू शकतो, ऑफिसचा कॉल अटेंड करू शकतो आणि पायऱ्याही उतरू शकतो. पण होतं असं की, आपण भाजीऐवजी बोट चिरतो, बॉसला 'आई' म्हणतो आणि पायऱ्यांवरून घसरून थेट खालच्या मजल्यावर लँडिंग करतो. हे 'मल्टी-टास्किंग' म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्याच पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारून घेण्याची एक आधुनिक कला आहे.

​विशेषतः स्वयंपाकघरात जेव्हा एखादी गृहिणी (किंवा हौशी गृहस्थ) कानाला फोन लावून, तो खांद्याने दाबून धरत मल्टी-टास्किंगचा प्रयत्न करतात, तेव्हा तो एक थरारपटच असतो. एका बाजूला सासूबाईंशी गप्पा सुरू असतात आणि दुसऱ्या बाजूला फोडणीची तयारी. गप्पांच्या नादात मिठाऐवजी साखर वरणांत पडते आणि मग जेवताना अख्खं कुटुंब 'गोड वरण' खाऊन मल्टी-टास्किंगचे गोड फळ चाखतं. एकदा तर माझ्या एका मित्राने फोनवर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकता ऐकता चहा बनवला. इतका तल्लीन झाला की चहाच्या गाळणीत चहा गाळण्याऐवजी त्याने थेट मोबाईलच गरम चहाच्या कपात बुडवला. मोबाईल 'वॉटरप्रूफ' होता की नाही माहीत नाही, पण त्या दिवशी त्याचा 'संपर्क' जगाशी कायमचा तुटला.

​रस्त्यावर चालताना मोबाईलवर बोलणाऱ्यांची तर गोष्टच वेगळी. हे लोक अशा आविर्भावात चालतात की जणू रस्ता त्यांच्या बापाचा आहे आणि समोरून येणारा ट्रक म्हणजे एखादी खेळण्यातली गाडी. रस्ता क्रॉस करताना कानाला फोन लावून, मान तिरकी करून चालणारी माणसं बघितली की भीती वाटते. ते समोरच्या माणसाला 'हो, मी पोहोचतोय' असं सांगत असतात, पण प्रत्यक्षात ते हॉस्पिटलला पोहोचण्याच्या मार्गावर असतात. एकदा एका महाशयांनी फोनवर बोलण्याच्या नादात सिग्नलकडे बघण्याऐवजी चक्क समोरच्या उघड्या मॅनहोलकडे दुर्लक्ष केलं. ते फोनवर म्हणत होते, "मी खोलवर विचार करतोय..." आणि दुसऱ्याच क्षणी ते खरंच मॅनहोलमध्ये खोलवर गेले होते. मल्टी-टास्किंगच्या नादात त्यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम जगाला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.

​आजकाल जिममध्ये जाणारी तरुण पिढी तर मल्टी-टास्किंगचा कळसच गाठते. ट्रेडमिलवर धावताना समोर टॅबवर चित्रपट बघायचा, कानात हेडफोन लावून गाणी ऐकायची आणि हातातल्या स्मार्टवॉचवर कॅलरीज मोजायच्या. इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र करताना एखादी स्टेप चुकली की हे 'फिटनेस फ्रीक' लोक ट्रेडमिलवरून अशा प्रकारे फेकले जातात की जणू इस्रोने एखादं नवीन सॅटेलाईट लॉन्च केलं आहे. मल्टी-टास्किंगच्या या नादात शरीराचे स्नायू बळकट होण्याऐवजी हाडं मात्र नक्कीच खिळखिळी होतात.

​बाथरूममध्येही आता मोबाईल शिरला आहे. दाढी करताना किंवा आंघोळ करताना गाणी ऐकणं किंवा न्यूज बघणं हा एक अनिवार्य भाग झालाय. पण विचार करा, आरशात बघून दाढी करायची की मोबाईलवर आलेला मेसेज वाचायचा? या गोंधळात अनेकदा गालावर 'झेड' (Z) आकाराचा कट येतो आणि मग ऑफिसला जाताना ते मल्टी-टास्किंगचं लक्षण चेहऱ्यावर अभिमानाने मिरवावं लागतं. खरं तर, मल्टी-टास्किंग म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची कला आहे. जेव्हा आपण दोन कामं एकत्र करतो, तेव्हा आपण एकाही कामाला १०० टक्के न्याय देऊ शकत नाही. आपण फक्त 'अर्धवट' कामांचा डोंगर उभा करतो.

​शेवटी काय, मल्टी-टास्किंग हे अष्टपैलू असण्याचं लक्षण नसून विसरभोळेपणाचं निमंत्रण आहे. एका वेळी एकच काम करा, म्हणजे निदान जेवण चविष्ट लागेल, रस्ता सुखरूप पार करता येईल आणि डोकंही ठिकाणावर राहील. अन्यथा, मल्टी-टास्किंगच्या नादात आपण असे काही पराक्रम करू की, लोक आपल्याला 'मल्टिपल' वेळा वेड्यात काढतील. जीवन हा एक प्रवास आहे, तो हळूहळू आणि लक्ष देऊन पार केलेला बरा; धावत आणि फोनवर गप्पा मारत तो लवकर संपवण्याची घाई कशाला?

©प्रणित अरविंद कठाळे

Comments

Popular posts from this blog

कालची अंधश्रद्धा आजचे विज्ञान