कालची अंधश्रद्धा आजचे विज्ञान


        विज्ञानाचा आणि माझा संबंध तसा जुनाच, म्हणजे शाळेतल्या प्रयोगाच्या वहीत आकृत्या काढण्यापुरता! पण हल्ली विज्ञानाच्या नावावर जे काही चालतं, ते बघून वाटतं की विज्ञानाची स्वतःची स्मरणशक्ती थोडी कच्ची असावी. काल जे 'चमत्कार' म्हणून हेटाळलं गेलं, तेच आज 'टेक्नॉलॉजी' म्हणून खिशात घेऊन आपण फिरतोय. आमच्या लहानपणी जादूच्या गोष्टी ऐकताना वाटायचं की काचेच्या गोळ्यात जग दिसणारा तो जादूगर नक्कीच कोणत्या तरी तांत्रिक-मांत्रिकाचा नातलग असावा. तेव्हाचे रॅशनल लोक म्हणायचे, "असं कसं शक्य आहे? डोळे मिटून किंवा काचेत पाहून लांबचं कसं दिसेल?" आज तेच लोक हातात स्मार्टफोन घेऊन व्हिडिओ कॉलवर अमेरिकेच्या नातवाशी गप्पा मारतात आणि म्हणतात, "नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, चेहरा स्पष्ट दिसत नाहीये!" म्हणजे जादूगाराच्या काचेच्या गोळ्याला 'बँडविड्थ' नव्हती इतकाच काय तो फरक. विज्ञान तेव्हाही होतं, पण तेव्हा ते 'अंधश्रद्धा' नावाच्या कपाटात बंद होतं, कारण कोणाकडे इंटरनेटचा रिचार्ज नव्हता.

​दुसरा विषय म्हणजे रामायण-महाभारतातले ते बाण. एका बाणातून दहा बाण निघणे किंवा समोरून येणाऱ्या बाणाला हवेतच कापून टाकणे, हे बघून आमचे विज्ञानवादी मित्र म्हणायचे, "काय फालतूपणा आहे, लॉ ऑफ मोशन कुठेय यात?" पण जेव्हा कुवैत-इराक युद्धात 'स्कड' आणि 'पॅट्रियट' मिसाईल्स एकमेकांना हवेतच भिडले, तेव्हा त्याच मित्रांनी चष्म्याची काच पुसत म्हटलं, "व्वा! काय डिफेन्स सिस्टिम आहे!" अरे भावा, बाणाचं नाव बदलून मिसाईल ठेवलं म्हणून त्यामागचं तत्त्व बदलत नाही. म्हणजेच काय, जोपर्यंत विज्ञानाला एखादी गोष्ट समजत नाही, तोपर्यंत ती 'गंमत' असते आणि एकदा का ती लॅबमध्ये सिद्ध झाली की ती 'प्रगती' होते. विज्ञानाच्या मर्यादा म्हणजे जणू एखाद्या लहान मुलाने समुद्र बघून म्हणण्यासारखं आहे की, "माझ्या बादलीत मावतंय तेवढंच पाणी खरं, बाकी सगळं मृगजळ!"

​योग आणि प्राणायामाच्या बाबतीत तर विज्ञानाने यू-टर्न मारण्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवलं असतं. पूर्वी ऋषीमुनींनी श्वास रोखून धरायला सांगितलं की आमचे पुरोगामी मित्र म्हणायचे, "ऑक्सिजन कमी झाला की मेंदू मरतो, हे सगळं थोतांड आहे." आज तेच लोक पाच हजार रुपये भरून 'माइंडफुलनेस' आणि 'डीप ब्रीदिंग'च्या वर्कशॉपला जातात. कपालभाती करताना जेव्हा पोट आत-बाहेर होतं, तेव्हा त्याला 'एनर्जी चॅनेलायझेशन' म्हटलं की ते सायंटिफिक होतं, पण 'योगासन' म्हटलं की मात्र त्यांना जुनाटपणाचा वास येतो. हे म्हणजे असं झालं की, आजीने दिलेला काढा पिणं म्हणजे अंधश्रद्धा, पण त्याच काढ्याला 'हर्बल डिटॉक्स टी' म्हणून पाचशे रुपयाला पिणं म्हणजे हाय-फाय सायन्स!

​मुळात विज्ञानाचा आणि पुराव्यांचा खेळ मोठा रंजक आहे. विज्ञानाचं असं झालंय की, जोपर्यंत एखादी गोष्ट मायक्रोस्कोप खाली दिसत नाही, तोपर्यंत तिचं अस्तित्व नाकारायचं. पण मग मनाचं काय? भावनांचं काय? एखादी आई मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मुलाचं डोकं दुखायचं थांबतं, याला विज्ञान 'प्लॅसेबो इफेक्ट' म्हणतं. आता त्या 'मायेला' हे लोक जोपर्यंत केमिकल फॉर्म्युलामध्ये बसवत नाहीत, तोपर्यंत ते तिला पूर्ण मान्यता देणार नाहीत. मेंदूची कार्यपद्धती तर अजूनही विज्ञानासाठी 'न सुटलेलं कोडं' आहे, तरीही 'आम्हाला सगळं कळतं' असा आव आणणारे अनेक जण असतात. विज्ञानाकडे उत्तर नसेल तर ती 'मर्यादा' असते, पण अध्यात्माकडे उत्तर असेल तर ती 'अंधश्रद्धा' ठरवली जाते, हाच मोठा विनोदी भाग आहे.

​पुरोगामीत्वाचा झेंडा मिरवणाऱ्यांची अवस्था तर त्यापेक्षाही भारी असते. त्यांनी आधीच एक निष्कर्ष काढून ठेवलेला असतो की, "हे चुकीचंच आहे." मग प्रयोग करायची तसदी कोण घेणार? त्यांच्यासाठी विज्ञान म्हणजे एखादी वस्तू शोधण्याचं साधन नसून, दुसऱ्याला चुकीचं ठरवण्याचं हत्यार झालंय. खरं तर विज्ञान म्हणतं 'शक्यता पडताळून पहा', पण हे लोक 'शक्यता नाकारण्यातच' धन्यता मानतात. उद्या जर विज्ञानाने सिद्ध केलं की रामाच्या पुलासाठी वापरलेले दगड कोणत्या विशेष फ्रीक्वेंसीवर तरंगत होते, तर हेच लोक म्हणतील, "आम्हाला आधीच माहीत होतं, हे पूर्णपणे सायंटिफिक आहे!" थोडक्यात काय, विज्ञानाच्या मर्यादा रोज विस्तारत आहेत, पण जुन्या ज्ञानाला 'अवैज्ञानिक' ठरवण्याची घाई मात्र कमी होत नाहीये. शेवटी, विज्ञान म्हणजे आजचं असत्य, जे उद्याच्या नवीन शोधामुळे खरं ठरू शकतं, पण 'सत्य' मात्र तिथेच असतं, फक्त विज्ञानाला तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो! शेवटी विज्ञान हे सत्याच्या शोधाचं साधन आहे, ते स्वतः 'अंतिम सत्य' नाही. त्यामुळे उद्या जर  'पुष्पक विमान' लँड होताना दिसलं, तर आश्चर्य वाटायला नको, कारण विज्ञानाचा प्रवास हा 'अशक्य' कडून 'शक्य' कडे जाणारा एक संथ लंगडा प्रवास आहे! फार तर असं म्हणू शकतो की आजची अंधश्रद्धा उद्यासाठी आयडियाची कल्पना आहे ,नाही का?


© प्रणित अरविंद कठाळे

Comments

Popular posts from this blog

मल्टी टास्कींग की मल्टी रिस्कींग